चला चला… पिस्तुले जमा करण्याची वेळ झाली

ठाणे : लोकसभा निवडणुक निर्भिड वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस दलाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवाना धारक शस्त्रे (पिस्तुल) जमा करण्याची कारवाई सुरु केली आहे.

निवडणूक काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूका जाहिर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रातील सर्व शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील ठाणे आणि उल्हासनगर निवडणूक क्षेत्रात शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण चार हजाराहून अधिक शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी बँका, महत्वाची कार्यालये, संस्था, विद्युत केंद्र व इतर महत्वाच्या कार्यालयाचे शस्त्र वगळून सर्व परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही शस्त्रे जमा करण्याचे आदेश संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आले असून शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.