ठाणे : एकनाथ शिंदे यांचे बंड थोपवण्यासाठी बुधवारी आमदार रवींद्र फाटक यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांचे बंड थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. त्यानंतर हे दोघे मंगळवारी सुरत येथे जाऊन शिंदे यांची भेट घेतली. २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर ते दोघे परत आले. त्यानंतर बुधवारी फाटक यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देखील श्रीकांत यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी बंड शमविण्यासाठी चर्चा केल्याची माहिती फाटक यांनी दिली. तसेच त्यांची देखील मनधरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे श्रीकांत यांनी देखील शिंदे यांच्या भुमीकेबाबत काही बोलण्यास नकार दिला असला तरी देखील शिवसेना-भाजपची युती व्हावी अशी आशा त्यांनी व्यक्त केल्याचेही फाटक यांनी सांगितले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी करणे हे देखील अयोग्यच होते. असेही त्यांनी सांगितले असल्याचे स्पष्ट केले. यावेळी फाटक यांच्याशी चर्चा केली असता, शिंदे हे शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते शिवसेनेतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यातही शिंदे यांनी काही चुकीच्या मागण्या केलेल्या नसून त्यांच्या मागण्या सफल व्हाव्यात आणि त्यांच्यासह सर्व आमदार शिवसेनेत राहोत हीच इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.