नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे: देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या.. हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि “नशामुक्त नवी मुंबई” या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, संजयकुमार पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.
आर्ट ऑफ सायलेन्स या मूकनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाच्या चित्रफितीच्या प्रकाशनाने झाले.
श्री.फडणवीस पुढे म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृह विभागासंबंधी घेतलेल्या बैठकीत कॅनडाचे उदाहरण दिले. ड्रग्जमुळे कॅनडा सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला. मात्र भारत ड्रग्जविरूद्धची ही लढाई जिंकू शकतो. देशातील सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करीत ही लढाई एकत्र लढायला हवी. सर्वांनी एकत्र येवून संपूर्ण भारत ड्रग्स मुक्त करायचा आहे, हा आपला निर्धार असायला हवा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 8828 112 112 या टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करा.
अभिनेता जॉन अब्राहम यांनी आपल्या मनोगतात “नशामुक्त नवी मुंबई” या अभियानाच्या आयोजनाबद्दल नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन करून आपले आयुष्य हे शिस्तमय असावे. आपण आपल्या आचरणाने मित्र परिवारामध्ये आदर्श निर्माण करावा आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगावे, असे आवाहन उपस्थित युवकांना केले.
सुरुवातीस नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.