समान पाणीपुरवठ्यासाठी आ. किणीकर यांची मजीप्राला धडक

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिम भागातील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा समान पुरवठा झालाच पाहिजे यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याला दिला.

शहरातील पाणी टंचाईच्या वाढत्या समस्येवरून नागरिकांत असंतोष पसरला आहे, लोकप्रतिनिधीना पाणी टंचाईच्या प्रकरणी उपोषण करावे लागले होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार 1 एप्रिल रोजी आमदार डॉ .किणीकर यांनी मजीप्रा कार्यालयाला धडक दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचा आढावा त्यांनी जाणून घेतला.

एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असून शहरात काही भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पुरेसे पाणी मिळावे अशी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मागणी होत आहे, काही भागात अनियमित तर काही भागात मुबलक पाणी पुरवठा होत असल्याबद्दल आमदार किणीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणी वितरण करणारे कर्मचारी कामचुकारपणा करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. मुख्य जलवाहिनीवरून पाणी घेतले असेल अशा जोडण्या खंडित कराव्यात, अन्यथा पाणी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी अधिकारी वर्गाला दिला.

उन्हाळ्यात पाणी कपात व पाणी नियोजन कसे असेल याचा आढावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांच्याकडून जाणून घेतला.

पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होतो. पावसाळा लांबला तर आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे, तोपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता देशपांडे म्हणाले.

श्रीनिवास वाल्मिकी, पुरषोत्तम महाराज उगले, गणेश कोतेकर, महिला शहर संघटक मालती पवार, सुभाष साळुंके, रवी पाटील, सुरेंद्र यादव, चंद्रकांत भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.