ठाण्यात कॉम्बिंग ऑपरेशन; हुक्का पार्लर बंद करणार !

आमदार संजय केळकर यांच्या मुद्द्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

ठाणे : हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असून याबाबत गुन्हे दाखल केले तर तीन वर्षाची शिक्षा आहे, पण ठाणे शहरात हुक्का पार्लर चालकांवर असे गुन्हे पोलिसांकडून दाखल होत नाहीत, अशी खंत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोधमोहिम सुरू करून ठोस कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असे सांगितले.

ठाणे शहरात तरुण पिढी हुक्का पार्लर संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे शहरासाठी लोकचळवळ उभारली, त्यास यशही मिळाले. पोलिसांनी कारवाया केल्याने ६० टक्के हुक्का पार्लर बंद झाले, पण अद्याप ४० टक्के पार्लर सुरू असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी सभागृहात दिली.

शहरात थेट हुक्का पार्लर सुरू आहेतच पण हर्बलच्या नावाखाली देखील हुक्का पार्लर सुरू आहेत. एवढेच नव्हे तर परमिट रूमच्या मागे देखील हा व्यवसाय सुरू आहे. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहे. समाज माध्यमांवर तर छुप्या आकर्षक जाहिराती प्रसारित केल्या जात असून त्या ठिकाणी गेल्यावर हुक्का पार्लर असल्याचेच आढळून येते. या हुक्का चालकांना व्यवसाय बंद करण्याची पोलिसांकडून फक्त समज दिली जाते पण या व्यवसायावर ठोस कारवाई करण्यात पोलिस कुचराई करत असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. ठाणेकर तरुणांना देशोधडीस लावणारे हे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद न करण्यामागे कोणते राजकारण आहे, अर्थकारण आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत शहरात कॉम्बिंग ऑपरेशन करून हे व्यवसाय बंद करण्यात येतील का, असा प्रश्न आमदार केळकर यांनी उपस्थित केला.

यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाणे शहरात शोध मोहीम सुरू करून हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश आजच देण्यात येतील, असे सांगितले.