सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीची ताकद वाढली
ठाणे: उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठाण्यात सहानुभूतीची लाट असतानाही मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांचीही रंगीत तालीम या निमित्ताने झाली आहे. लोकसभा निवडणुकित मतांची गोळाबेरीज केली असता ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची ताकद वाढल्याचे दिसते.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १३ लाख ९,३०२ इतके मतदान झाले होते. विजयी आकडा गाठण्यासाठी उमेदवाराला किमान साडे सहा लाखांपेक्षा जास्तीचा आकडा पार करणे आवश्यक होते. या रणनितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी बाजी मारली आहे. त्यांनी २०१४ पासून सलग दोन वेळा ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येणार्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला आहे. प्रतिष्ठा आणि अस्तित्वाच्या या लढाईत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी ७,३४,२३१ इतकी मते मिळवत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा हॅट्रिकचा रथ रोखला आहे. अटीतटीच्या लढतीत विचारे यांना पाच लाख १७,२२८ मते मिळाली असून म्हस्के यांनी तब्बल दोन लाख १७००२ मतांच्या आघाडीने विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे २०१९ साली राजन विचारे यांना मिळालेल्या सात लाख ४०,९६९ मतांच्या जवळ नरेश म्हस्के खासदारकीच्या पहिल्याच निवडणुकीत पोहचले आहेत.
महायुतीचे उमेदवार असल्यामुळे नरेश म्हस्के यांना भाजपच्या मतांची मदत मिळाली आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाने शेवटच्या १० दिवसांत ऐरोली, बेलापूर ते मीरा- भाईंदरपर्यंतचा भाग पिंजून काढला. महिला बचत गट, महिला आघाडीचीही शक्ती या विजयामागे भक्कम उभी राहिली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केल्यामुळे त्यांना बळ मिळाले.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व आमदार हे महायुतीचे आहेत. तर माजी नगरसेवकही महायुतीचे आहेत. पदाधिकारी, कार्यकत्यांची मोठी फौज, आर्थिक बळ असे अनेक जमेच्या बाजू नरेश म्हस्के यांच्या विजयाच्या मागे आहेत.
ठाणे हा शिवसेनेचा गड असला तरी भाजप किंवा संघविचारी मतदारांचा मतदासंघ आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला त्यामुळे येथून सर्वाधिक मते म्हस्के यांच्या पारड्यात पडली. ठाणे शहरात संघविचारी मतदार असल्याने नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मते म्हस्के यांच्या ओंजळीत पडल्याचे दिसते.
ओवळा माजिवाडा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदार होते. त्या तुलनेत या मतदासंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला सर्वाधिक दीड लाखाहून अधिक मतदान झाले आहे. या मतदारसंघाचे नेतृत्त्व शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक करतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात दिलेला निधी दिला होता. येथे झालेल्या विकासकामांमुळे शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक मतदान झाले असल्याचे समाधान आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.
ठाणे लोकसभा मतदारसंघ
विधानसभा ए. मतदान नरेश म्हस्के राजन विचारे नोटा
कोपरी पाचपाखाडी 184521 111135 66260 2491
ठाणे शहर 212798 126431 66260 2956
ओव्ाळा माजिवाडा 258248 154038 92639 3851
मीरा-भाईंदर 223890 127913 87263 2762
ऐरोली 221748 109618 99820 2734
बेलापूर 203214 102974 90662 2974