दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करा; मेस्टा संघटनेची मागणी

ठाणे: दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला मेस्टा संघटना ठाणे जिल्हा खजिनदार उत्तम सावंत, दिवा अध्यक्ष साईनाथ म्हात्रे, सचिव स्वप्निल गायकर आदी उपस्थित होते.
दिवा येथील एका अनधिकृत शाळेत 3 डिसेंबर 2024 रोजी निंदनीय असा प्रकार घडलेला आहे. अशा अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासाठी मेस्टा संघटनेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक विभाग, शिक्षण उपायुक्त, चर्नी रोड, मुबंई, तसेच विभागीय आयुक्त शिक्षण विभाग पुणे या विविध ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून दिवा येथे सुरु असलेल्या अनधिकृत शाळांची माहिती शासन दरबारी पोहचवीत असून या अनधिकृत शाळा बंद होणेऐवजी त्यांची संख्या 40 वरून 70 च्या वर झाली आहे. या अनधिकृत शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचे गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, लेटर हेड व स्टॅप हे बनवायचे कोणतेही अधिकार नसतांना विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक सुरु असून अनधिकृत शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्रे दिले जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शिक्षणाधिकारी ठाणे महानगरपालिका, ठाणे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग ठाणे यांच्या कार्यालयात सातत्याने भेट देऊनही त्यांच्या द्वारे कोणतीही कार्यवाही अनधिकृत शाळांवर करण्यात आली नाही असेही यावेळी सांगून प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई अनधिकृत शाळांवर होत नाही, याचा अर्थ काय समजावा? असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 40 अनधिकृत शाळांवर एफआयआर दाखल झाला होता त्यानंतर वर्ष 2024-25 मध्ये नवीन 23 अनधिकृत शाळा चालू झाल्या आहेत, त्यामुळे दिवा शहरात एकूण 63 अनधिकृत शाळा सुरू आहेत, परंतु शासनाने फक्त 29 एफआरआय दाखल केले आहेत. संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद व्हाव्यात या करिता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, कोर्टात केस सुरु असून लवकरात लवकर निकालाची अपेक्षा आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.