आठवडा बाजार बंद करा; भाजीविक्रेते आक्रमक

बदलापूर: बदलापुरात सुरू असलेले ब बेकायदा आठवडा बाजार बंद करण्याच्या मागणीवरून भाजी विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत आज नगरपालिका कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.

बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येलवे, आणि प्राजक्ता येलवे यांच्या नेतृत्वाखाली भाजी विक्रेत्यांनी मोर्चा काढला, प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बदलापूर शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर आठवडा बाजार सर्रासपणे सुरू आहेत यामुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आठवडा बाजारात कपडे, भांडी, भाजी आदी गृहोपयोगी वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने, नागरिक या ठिकाणी खरेदीला जातात. त्यामुळे, स्थानिक बाजारपेठा आणि येथील स्थानिक भाजी विक्रेते यांचा माल विकला जात नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची तक्रार भाजी विक्रेत्यांनी केली.

आठवडा बाजारांवर कारवाई करा याबाबत, अनेकदा पालिकेकडे पत्र व्यवहार आणि निवेदने देण्यात आली. कारण बहुतांश आठवडी बाजार हे पालिकेच्या हद्दीत असणाऱ्या जागेत, पालिकेच्या अधिकारांच्या परवानगीने चालवले जातात, असा आरोप या भाजी विक्रेत्यांनी केला आहे. मात्र कोणतीच दखल पालिका घेत नसल्याने आठवडी बाजार बंद होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा निलेश येलवे आणि भाजी विक्रेता संघाचे बदलापूर अध्यक्ष सुरेश उर्फ मामा जवळेकर यांनी दिला आहे.

लवकरच संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बदलापूर शहरात खाजगी ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी चालू असणाऱ्या आठवडी बाजाराची माहिती घेऊ, नियमानुसार या आठवडी बाजारांवर कारवाई करून, ते बंद करणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. तसेच उच्च न्यायालयाच्या नियमानुसार, स्टेशन परिसरापासून दीडशे मीटर अंतरावर फेरीवालामुक्त परिसर असावा याबाबत नियमावली असून त्याप्रमाणे, स्थानिक भाजी विक्रेत्यांनी देखील या परिसरात भाजी विक्रीसाठी बसू नये अन्यथा, त्यांच्यावर देखील कारवाईचा इशारा मुख्याधिकारी गायकवाड यांनी दिला.