उल्हासनगर : वर्षोनुवर्षे मतदानापासून वंचित राहणाऱ्या उल्हासनगरातील 50 तृतीयपंथीयांना ओळ्खपत्राचे वाटप करण्यात आले, त्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
31 मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन आहे. त्यानिमित्ताने 27 मार्च ते 2 एप्रिल हा तृतीयपंथीयांच्या मतदान नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार 29 मार्च रोजी तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक उपायुक्त प्रियंका राजपूत यांना दिल्या होत्या.
पालिकेच्या शाळा क्रमांक 27 मध्ये तृतीय पंथीयांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शिबिरात ज्या तृतीयपंथीयांनी कागदपत्रांची पूर्तता केली होती, त्यांना निवडणूक उपायुक्त प्रियंका राजपूत, तहसीलदार कोमल ठाकूर, गेल्या अनेक वर्षांपासून तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या नगरसेविका रेखा ठाकूर, निवडणूक विभागप्रमुख मनिष हिवरे, समग्र शिक्षा अभियानाच्या अधिकारी संगीता लहाने यांच्या हस्ते मतदान ओळ्खपत्राचे वाटप करण्यात आले.
ज्या तृतीयपंथीयांनी सादर केलेल्या कागदपत्रात त्रुटी आढळल्या आहेत, त्यांच्याकडून नवीन कागदपत्रे घेण्यात आली असून त्यांना लवकरच मतदान ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रियंका राजपूत यांनी दिली.