ठाणे : भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राकडून ठाण्यासह कोकण किनारपट्टीची साफसफाई करण्यात येणार आहे. नवे कमांडर मनोज बाडकर यांचे प्लास्टिकमुक्त आणि सुरक्षित किनारे हे ‘लक्ष्य’ असून लवकरच ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि सप्टेंबरमध्ये होणा-या ‘आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन’ निमित्त राज्य शासकीय आणि शासनाच्या अन्य यंत्रणा व सर्व केंद्रीय मंत्रालयांनी, एनजीओ, शैक्षणिक संस्थांनी आदींनी संपूर्ण देशातील ७५ किनारपट्टींची सफाई करण्याचा विडा उचलला आहे. सर्व समुद्र आणि महासागर तटरक्षकासाठी सर्वात महत्वाचे आहेत. त्यापैकी पश्चिम किनारपट्टीत असलेल्या २५ किनारपट्टींची ‘साफ’ सफाई भारतीय तटरक्षक दलाकडून होणार आहे. विशेषत: यावर्षी समुद्र, महासागर यात प्लास्टिक न जाता ते स्वच्छ आणि सुरक्षित राहतील हे निश्चित केले आहे, अशी माहिती ‘कमांडर’ मनोज बाडकर यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली. येत्या वर्षभरात या सर्व २५ किनारपट्ट्यांची सफाई करण्याचे तटरक्षक दलाचे ‘लक्ष्य’ आहे, असे त्यांनी सांगितले.
सन २०१८ मध्ये महानिरीक्षक या पदावर पदोन्नती होण्यापूर्वी आणि दिल्लीतील तटरक्षक सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी, बाडकर यांनी २००६ ते.२००८ पर्यंत कर्नाटक आणि गोव्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून सन २०१३ ते २०१८ या कालावधीत कामगिरी बजावली आहे. 36 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी अनेक तटरक्षक नौका आणि तळांचे नेतृत्व केले आहे.