पावसाळी आजार टाळण्यासाठी ठामपाची विशेष मोहीम
ठाणे: पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा, काविळ, पोटदुखी, उलट्या अशा आजारांची लागण होण्याची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी महापालिकेने इमारतींमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याबाबत पुढाकार घेतला असून पाण्याचे नमुने तपासून गळक्या जलवाहिन्या बदलण्यासाठीही ठाणेकरांना आवाहन केले आहे.
पाणी साठवणुकीच्या टाकीमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पालिकेने १० प्रभाग समित्यांसाठी अभियंत्यांचे पथक नेमले आहे. या पथकामार्फत सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागासह ठाणे शहराला फटका बसला असून ऊन आणि पावसाच्या या खेळामुळे संसर्गजन्य आजारही वाढले आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा, काविळ, पोटदुखी, उलट्या यासारखे साथीचे आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. हे साथीचे आजार डोके वर काढू नयेत, यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून घेण्याचे आवाहन ठाणेकरांना केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडून होणार्या पाण्याचा दर्जा खालावत चालला आहे. पावसाळ्यात परिसरात साचलेले पाणी भूमिगत पाण्याच्या टाक्यांमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये भूमिगत टाकीमध्ये पाणी साठवून मग ते इमारतीच्या गच्चीवरील टाकीत चढवले जाते. त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास येत असते. त्यामुळे यंदा पालिकेने आधीच सतर्क होत खबरदारी घेतली आहे.
शहरातील पाणी पुरवठा करणार्या अनेक जलवाहिन्या या गटार परिसरातून जातात. या जालवाहिन्या तपासून जलवाहिनीला गळती असल्यास त्वरित पालिकेशी संपर्क साधून ती बदलून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाणी गढूळ येत असल्यास किंवा दूषित आढळल्यास त्वरित पालिकेच्या प्रदूषण विभागात नमुन्यासह ते चाचणीसाठी सादर करण्यास पालिकेने सांगितले आहे. तसेच पावसाळयातील संभाव्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहनही केले आहे.
कोणाशी संपर्क साधाल?
नौपाडा: छोटेलाल गवळी ९१६७३०७१५४
कोपरी: राजेंद्र साळुंके ९८६७५०५०८५
उथळसर: रामकृष्ण देसले ९२२१६२०४७९
कळवा: गणेश वाघ ९२२१३९६५६९
मुंब्रा: रायसाहेब ९९८७०३६६२३
दिवा: सुरेश वाघेरे ९८३३७४७५८१
वागळे: कुणाल बर्वे ९५०३९७५५८२
लोकमान्य-सावरकर: कुणाल बर्वे ९५०३९७५५८२
वर्तकनगर: मुरलीधर भोये ७५०६१११७५७
रुपाली राव: ८०९७२४५६६२
माजिवडा-मानपाडा: संजय शेटे ९८९२८०३४१४
पालिका मुख्यालय: ०२२२ ५३३१५९०(विस्तार क्र ३७३)