भिवंडी: शहरभर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असतानाच, कचरा उचलण्याच्या ठेक्यावरून दोन ठेकेदारांमध्ये महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच दमदाटी, शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी दोन्ही ठेकेदारांसह त्यांच्या साथीदारांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निखिल अग्रवाल (४०) रा.भाईंदर हे भिवंडी महापालिकेचे ठेकेदार असून त्यांचा कचरा उचलण्याच्या ठेक्यावरून महेश शिर्के, गिरीश शेट्टी व त्यांच्या इतर दहा ते पंधरा साथीदारांशी वाद झाला होता. विशेष म्हणजे अग्रवाल यांनी कचरा उचलण्याच्या ठोक्या बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिके संदर्भात जाब विचारण्यासाठी महेश शिर्के, गिरीश शेट्टी हे मनपा मुख्यालयात आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आले असता निखिल अग्रवाल यास शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली.
याप्रकरणी निखिल अग्रवाल यांनी महेश शिर्के गिरीश शेट्टी व इतर दहा ते पंधरा जणांविरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर महेश शिर्के, गिरीश शेट्टी यांचे साथीदार असलेले विकास अहिरे यांनी निखिल अग्रवाल यांच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.