वादग्रस्त पेस ज्युनिअर सायन्स कॉलेजकडून मागविला खुलासा

* कॉलेजवर कारवाई करण्याची ‘मनविसे’ ची मागणी

* कारवाई करण्यास शिक्षण विभागाची टाळाटाळ

ठाणे : ठाण्यात अनेक शिक्षण संस्था बेकायदेशीर सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र सरकारी नियमाच्या कक्षेत नसलेल्या अनेक संस्था आजही खुलेआम सुरू आहेत. याचा फटका मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत आहे.

ठाण्यातील गोखले रोड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पेस ज्युनिअर सायन्स कॉलेज बेकायदेशीरपणे सुरू असल्याची बाब मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणली. यानंतर शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केल्यानंतर शिक्षण विभागाने अहवाल तयार केला. मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने पाचंगे यांनी पुन्हा शिक्षण विभागाला पत्र पाठवित सुस्त प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. अखेर चार महिन्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी याची दखल घेत बेकायदेशीर सुरू असलेल्या पेस ज्युनिअर सायन्स कॉलेजकडे अहवालाबाबत खुलासा मागविला आहे.

ठाण्यातील पेस ज्युनिअर सायन्स कॉलेज बेकायदेशीरपणे सुरू असल्याबाबत शिक्षण विभागाला पत्र दिल्यानंतर ९ नोव्हेंबर २०२३ ला जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी छाया पराडके यांनी तपासणी अहवाल तयार केला. यामध्ये व्यवस्थापन व संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या नावे संयुक्तरित्या ठेवलेली मुदत ठेव प्रमाणपत्र नसणे, शाळेची जागा, इमारत मालकीची नसणे तसेच इमारतीत सहा वर्ग खोल्या असून इतर वर्ग मूळ इमारतीपासून ५०० मीटरच्या अंतरावर पूर्वपरवानगी न घेता सुरू आहेत, इमारत ही पुरेशी व शैक्षणिकदृष्ट्या योग्य असल्याबाबत नॅशनल बिल्डिंग कोड २००५ नुसार असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नाही, या शिक्षण संस्थेचे क्रीडांगण उपलब्ध नाही, विशेष म्हणजे सायन्स कॉलेज असूनही जीवशास्त्र प्रयोगशाळा नसल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्याही कमी आहे. अशा अनेक गोष्टींच्या त्रुटीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे.

या संस्थेचे ठाणे, मुंबई, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई अशा ठिकाणी कॉलेज आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधा, सुरक्षितता मिळणार नसतील तर नियमावली तयार करून उपयोग काय? असा सवालही पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत अहवाल तयार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे २ फेब्रुवारी २०२४ रोजी पुन्हा मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला. अखेर चार महिन्यांनी शिक्षण विभागाला जाग आली असून विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी कॉलेजकडे तात्काळ खुलासा मागविला आहे.

शिक्षण विभाग जाणीव पूर्वक कारवाईस विलंब करत आहे. बेकायदेशीर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर फसवणूक झालेले पालक नेहमी येत असतात. पालकांकडून भरमसाठी फी घेऊन जर विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधा मिळणार नसतील तर मनविसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संदीप पाचंगे यांनी दिला आहे.