सीएए अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात

गृहमंत्रालयाने १४ जणांना दिली प्रमाणपत्रे

नवी दिल्ली: एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारने नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 ची अधिसूचना जारी झाल्यानंतर पहिल्यांदाच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत काही अर्जदारांना भारताचे नागरिकत्व प्रमाणपत्रे दिली.

नागरिकत्व सुधारणा कायदा 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेने मंजूर झाला होता. यानंतर या कायद्याविरोधात देशभरात सीएए आंदोलने आणि निदर्शने झाली. यामुळेच सरकारला हा कायदा तात्काळ लागू करता आला नाही. अखेर केंद्र सरकारने 11 मार्च 2024 रोजी नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 अधिसूचित केला. यानुसार, 31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे.

नागरिकत्वासाठी अर्ज कसा करायचा

सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम भारतात येण्याची तारीख सांगावी लागेल. आवश्यक कागदपत्रे म्हणजेच, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र, तीन शेजारील देशांचे कोणतेही सरकारी प्रमाणपत्र द्वा लागेल. याशिवाय अर्जदाराला हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन किंवा जैन समुदायातील असल्याची पुष्टी करणारे प्रमाणपत्र द्यावे लागेल. नागरिकत्वासाठी अट अशी आहे की, अर्जदार 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेला असावा.