* दिवसाला एकच तक्रार
* हवेचा गुणवत्ता निर्देशांकही घसरला
ठाणे : प्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या हेल्पलाईनकडे ठाणेकरांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याचे उघड झाले आहे. प्रदूषणाबाबत दिवसाला केवळ एकच तक्रार येत असून गेल्या २१ दिवसांत ठाणे महापालिकेच्या हेल्पलाईनवर केवळ २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील घसरला असल्याचे उघड झाले आहे.
मुंबईपाठोपाठ ठाणे शहरातही हवेचे प्रदूषण काही प्रमाणात वाढत आहे. ते प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नागरिकांना प्रदूषणाबाबत तक्रार करता यावी यासाठी हेल्पलाईन सुरू केली होती. ८६५७८८७१०१ या व्हॉटसॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नागरिकांना नोंदवता येणार आहे. मात्र त्या हेल्पलाईनकडे चक्क ठाणेकरांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. २१ दिवसांत अवघ्या २१ तक्रारी नोंदवल्या गेल्या असून त्या सर्व २१ तक्रारींचा निपटारा लावण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सरासरी दिवसाला एक तक्रार नोंदवली जात असल्याने या हेल्पलाईनला अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हा अल्पप्रतिसाद नेमका ठाणेकर नागरिकांकडून कशामुळे मिळत याची चाचपणी आता ठाणे महापालिकेकडून सुरु करण्यात आली आहे. उघड्यावर कचरा जाळणे, बांधकाम होत असताना परिसरात धूळ/ धूराचा उपद्रव होणे, रस्त्यावरील बांधकाम कचरा/डेब्रिजची विना- आच्छादन वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण, बांधकामाचा कचरा इतस्ततः टाकला जाणे, हॉटेल-बेकरीमधून होणारे धूळ/ धुराचे प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्र वास, वाहनांचे अवैध पार्किंग, इत्यादी हवा प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नागरीक हेल्पलाईनवर व्हॉट्सॲपद्वारे छायाचित्रासह नागरिकांना या हेल्पलाईनवर तक्रारी नोंदवता येणार आहे.
दुसरीकडे दुसरीकडे ठाण्याची हवा देखील माध्यम प्रदूषित असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील घसरला असल्याचे उघड झाले आहे. ठाण्यात हवेच्या प्रदूषणात वाढ होत असून सध्याचा हवेचा निर्देशांक १३४ वर पोहचला असल्याची नोंद प्रदूषण विभागाने केली आहे. दिवाळीत वाढलेली प्रदूषण काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कमी झाले होते. मात्र पुन्हा ठाण्याची हवा बिघडली असून महापालिकेची कारवाईची मोहीम देखील थंडावलेली आहे. विशेष करून उपवन परिसरात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १७८ एवढा नोंदविण्यात आल्याने प्रदूषण विभागाने आश्यर्य व्यक्त केले आहे. या भागात जास्त हवा का बिघडली यांचा अभ्यास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घोडबंदर येथील हवेची गुणवत्ता १०१ तर तीन हात नाका परिसरात १२४ एवढा एयर इंडेक्स नोंदविण्यात आला आहे.