ठाणे : शिळफाटा येथून मुंब्रा-पनवेल रोडने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले व डायघर पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईलही हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण खडकपाडा येथे राहणारा संदीप यादव (26) हा शिळफाटा येथील रिलायन्स कंपनीत नोकरीला आहे. तो 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास शिळ फाट्यावरून मुंब्रा-पनवेल रोडने पायी त्याच्या कार्यालयाकडे जात होता. त्याचवेळी रॉयल हॉटेलजवळील रस्त्याने जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील चालकाने त्यांचा मोबाईल हिसकावला. संदीपने प्रसंगावधान राखून मोठ्या धाडसाने मोटारसायकल चालकाला पकडले. यावेळी तिथून जाणाऱ्या एका नागरिकाने संदीपचा खाली पडलेला मोबाईल त्यांना परत दिला तर स्थानिक रहिवाशाच्या मदतीने चोरट्याला जमावाने पकडले. त्याचवेळी डायघर पोलिसांचे गस्तीवरील पथकही तिथे आले. या पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या धुमश्चक्रीत त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार झाल्याचे डायघर पाेलिसांनी सांगितले.