शासकीय अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात नागरिकांचा संताप
अंबरनाथ : अंबरनाथच्या डंपिंग ग्राऊंडमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे चिखलोलीसह जांभूळ परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. मागील वर्षी सुरु करण्यात आलेल्या डंपिंग ग्राउंडमुळे जल आणि वायू प्रदूषणाचा त्रासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रदूषित पाण्यामुळे शेतजमिनींचेही नुकसान होत आहे. डंपिंग ग्राऊंड सध्याच्या जागेवरून त्वरित हटवण्याची मागणी करत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
चिखलोली डंपिंग ग्राऊंडच्या होणाऱ्या त्रासाबाबत नागरिक आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. हरित लवादाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उप विभागीय अधिकारी जयराज कारभारी, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी कुकडे , यांच्या पथकाने आज मंगळवार २६ जुलै रोजी डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर संयुक्त पाहणी करण्यात आली.
अधिकारी पाहणी करण्यास येणार असल्याचे समजताच डंपिंग ग्राउंड परिसरातील विविध संकुलांमध्ये राहणारे नागरिक, ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता. डंपिंग ग्राऊंडमुळे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच दूषित पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे भाजपा शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रज्ञेश तेलंगे यांनी निदर्शनास आणून दिले. पावसाळ्यात डंपिंग ग्राऊंडमधील दूषित पाणी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तसेच जवळून वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाणी जाते. जांभुळसह चोण आणि परिसरात नागरिकाना दुर्घनदीचा त्रास होत असून शेतजमिनीचे देखील नुकसान होत असल्याचे जांभूळ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित पिसाळ म्हणाले. सरकारी अधिकारी पहाणी करण्यासाठी येणार यासाठी परिसरातील साफसफाई करण्यात आली आहे. यापूर्वी अशी कार्यवाही नगरपालिकेने का केली नाही असा सवाल बदलापूरचे माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे, शैलेश भोईर यांच्यासह परिसरातील रहिवाश्यांनी होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
चिखलोलीला निसर्गरम्य वातावरण असल्याने लाखो रुपये घालून घरे घेतली, पण मागील वर्षांपासून डंपिंगच्या होणाऱ्या त्रासामुळे वायू आणि जलप्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आल्याचा गंभीर आरोप सर्वोदय स्केअर, मेट्रो हायलँड, आदी गृहसंकुलातील संतप्त महिलांनी केला. अंबरनाथच्या चिखलोली येथील सर्व्हे नंबर १३१ मध्ये लोकवस्ती असलेल्या जागेत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मागील वर्षी ऑगस्ट २०२१ साली अंबरनाथ शहरातील कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांचा विरोध असताना तात्पुरत्या कालावधीसाठी कचरा टाकण्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र वर्ष उलटले तरीही पालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही का केली नाही असा सवाल तुकाराम म्हात्रे यांनी विचारला. लवादाकडे तक्रार जाताच नगरपालिकेने कचऱ्यावर परिसरातील डोंगर पोखरून माती टाकण्यास सुरुवात केली आहे. जमिनीतील जलपातळी प्रदूषित झाल्याने भातशेतीची हानी झाली असून याला जबाबदार कोण असा सवाल विचारण्यात आला. सर्व्हे नंबर १३२ मधील डंपिंग ग्राउंड बंद करून अन्यत्र हलवण्यात यावे, अशी मागणी भाजयुमोचे पश्चिम शहराध्यक्ष तेलंगे यांनी केली.
डंपिंग ग्राउंडच्या बाबत हरित लवादाकडे अपील दाखल करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संयुक्त समिती नेमण्यात आली असून डंपिंग ग्राऊंडची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. जागेच्या पाहणीनंतर विविध यंत्रणेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल, असे उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी सांगितले.