रेल्वे पादचारी पुलाचे काम संथगतीने
अंबरनाथ: अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा एकमेव रेल्वेवरील पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. मात्र दुरुस्तीचे काम संथगतीने सुरु असल्याने त्याचा प्रवासी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी गाडी पकडण्याच्या नादात जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडताना दिसत आहेत.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा पूल नादुरुस्र्त झाल्याने ५ मेपासून १५ जून या दीड महिन्याच्या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फलाटाच्या मध्यभागी बांधलेल्या पादचारी पुलाचा वापर नागरिकांनी येण्या-जाण्यासाठी करावा असे आवाहन केले आहे, त्यानुसार नागरिक पादचारी पुलाचा वापर करतात, त्यामुळे मध्यभागी असलेल्या पादचारी पुलावर एकच गर्दी होत आहे. तसेच व्यवसाय, नोकरीनिमित्त लोकल पकडण्यासाठी प्रवासी या आणि मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचा वापर करताना आढळून येतात. काही वेळा घाईच्या नादात लोकल पकडण्यासाठी प्रवासी लोहमार्ग ओलांडून जाताना दिसतात.
पूर्व आणि पश्चिम दिशेला असणाऱ्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करून प्रवासी आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी व्यापारी संघटनेतर्फे सरचिटणीस युसूफ शेख आणि आणि युवा युनिटी फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष योगेश चलवादी यांनी केली आहे.