शहरे वॉटर मेट्रोने जोडणार; सर्व क्षेत्रांना उभारी देणार!

भाजपचा लोककेंद्री संकल्प पत्राचे प्रकाशन

ठाणे : जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवुन भाजपने एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राचा १०० टक्के प्रतिबद्धतेचा संकल्प केला असून केरळच्या धर्तीवर ‘वॉटर मेट्रो’ सुरू करून महाराष्ट्रातील किनारी शहरे आणि बेटे जलमार्गाद्वारे जोडण्यात येणार आहेत. तर विविध क्षेत्रांना उभारी देऊन सामान्यांपासून उद्योगांपर्यंत आर्थिक सक्षमीकरण करण्याचा संकल्प भाजपाने सोडला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाशन सोमवारी ठाण्यात मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, भाजप प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी, सागर भदे, ॲड. सुभाष काळे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राच्या विकासाची, प्रगतीची वाटचाल अशीच पुढे सुरु ठेवण्यासाठी राज्यात भाजप महायुतीचे सरकार कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी, भाजपच्या ५६ पानी संकल्प पत्रातील महत्वाच्या २५ तरतुदींचा आढावा घेताना कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रिडा तसेच उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा संकल्प केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात एआयचा वापर करून महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व एआयची राजधानी बनवण्यात येणार असून देशातील पहिली विशेष एआय विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. गडकिल्ले जतन, संवर्धनासाठी विकास प्राधिकरण स्थापून प्रत्येक जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र उभारण्यात येणार आहे. सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत ‘व्हीजन महाराष्ट्र @ २०२९ सादर करण्यात येईल. रस्ते, हवाई सेवेच्या सुविधा तसेच कोचीच्या (केरळ) धर्तीवर वॉटर मेट्रोचा सुद्धा विचार भाजपच्या संकल्प पत्रामध्ये करण्यात आला आहे, ज्यामुळे जलवाहतुकीला एक वेगळ्या पद्धतीचे प्राधान्य मिळून राज्यातील किनारी शहरे आणि बेटे जलमार्गाद्वारे जोडण्यात येणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील पुढच्या पिढीचा विकास कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक नियोजनबद्ध असा आराखडा मांडल्याचे चव्हाण म्हणाले.

विरोधकांचे जाहिरनामे ‘प्रिटींग मिस्टेक’ – रवींद्र चव्हाण

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने समाजातील सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक विकासाचे धोरण असलेला आणि २०२८ पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प केला आहे. ही भाजप महायुतीची ग्वाही आहे. मात्र, काँग्रेस व युपीएच्या जाहिरनाम्यातील बाबींची पुर्तता झाली नाही की ती त्यांची “प्रिटींग मिस्टेक” असते, विरोधकांना विकासाचे कधीच गांभीर्य राहिलेले नाही. अशी टीका मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली.