सीआयएसएफ जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उल्हासनगर: गाझियाबाद येथे तैनात असलेल्या ४० वर्षीय सीआयएसएफ जवान अनिल निकम (४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना समोर आली आहे. शांतिनगर स्मशानभूमीत त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

उल्हासनगर-३ येथील शांतिनगर परिसरात राहणारे अनिल अशोक निकम हे गेल्या १० वर्षांपासून सीआयएसएफमध्ये कार्यरत होते. ८ एप्रिल रोजी संध्याकाळी गाझियाबाद येथे ऑन ड्युटी असताना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जवानाचे पार्थिव सीआयएसएफच्या तुकडीने उल्हासनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणले.

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरमध्ये शोककळा पसरली. सोमवारी शांतिनगर स्मशानभूमीत शेकडो नागरिक, नातेवाईक, पोलिस अधिकारी आणि सैन्यदलाच्या उपस्थितीत अनिल निकम यांना शासकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय” अशा घोषणा देण्यात आल्या.