सिडको युनियनवर पुन्हा एकदा प्रगती पॅनेलचे वर्चस्व

विरोधी पॅनेलने माघार घेतल्याने प्रगती पॅनेलचे उमेदवार बिनविरोध 

नवी मुंबई : सिडकोच्या ५० वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच कर्मचारी युनियनच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध करून सिडको कर्मचाऱ्यांनी आपल्यातील एकजुटीचे दर्शन घडवले आहे. युनियनच्या अध्यक्ष पदासाठी प्रगती पॅनलचे विनोद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा शुक्रवारी निवडणुक अधिकाऱ्यांनी केली.

मुदत संपलेल्या सिडको एम्फ्लॉईज युनियनच्या नवीन कार्यकारणीच्या निवडीकरिता येत्या १० फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक संपन्न होण्यापूर्वीच समता पॅनेलच्या ३ व १ अपक्ष अशा चार उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे प्रगती पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे गत १५ वर्षांपासून सिडको एम्प्लॉइज युनियनवर फडकत असलेला प्रगती पॅनेलचा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला आहे.

सिडको एम्प्लॉइज युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या युनियनच्या अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी युनियनचे उपाध्यक्ष विनोद पाटील सांभाळीत होते. करोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्ष नवीन कार्यकारिणीची निवड होऊ शकली नव्हती. करोना आपत्तीची तिसरी लाट ओसरत असल्याने युनियनने रितसर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

परंतु या निवडणुकीत युनियनवर गत १५ वर्षांपासून पकड असलेल्या प्रगती पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांना वेळोवेळी सुविधा मिळवून दिल्याने विद्यमान युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात म्हणजेच प्रगती पॅनेल विरोधात तुल्यबळ असे उमेदवार समता पॅनल देऊ शकली नाही. २५ सदस्यांच्या कार्यकारिणीकरिता समता पॅनेल तर्फे तीन व एक अपक्ष असे अवघे चार उमेदवार प्रगती पॅनलच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

परंतु, प्रगती पॅनेलला कर्मचाऱ्यांचा असलेला पाठिंबा लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या चारही उमेदवारांनी  उमेदवारी अर्ज मागे घेतत्यामुळे निवडणूकीचे कामकाज पाहणारे निवडणूक निरीक्षक नितीन घरत यांनी युनियनच्या अध्यक्षपदी प्रगती पॅनलचे विनोद पाटील यांची तर सरचिटणीसपदी जे.टी.पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

प्रगती पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आल्याने सिडकोत शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. युनियनच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र हिरे, संजय पाटील, तर चिटणीसपदी नितीन कांबळे व खजिनदार पदी दत्ता तांडेल हे बिनविरोध निवडून आले आहेत.