विल स्मिथने कानाखाली लगावल्यानंतर अखेर ख्रिस रॉकने सोडलं मौन

संपूर्ण सिनेजगताला प्रतिक्षा लागलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा सोमवारी पार पडला. करोनानंतरच्या मनोरंजन समीकरणांनी बदलत असलेल्या ऑस्कर सोहळय़ात यंदाही कुणा एका चित्रपटाला महत्त्वाच्या आणि मानाच्या पुरस्कारांवर तगडे वर्चस्व राखता आलं नाही. मात्र यावेळी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात असं काही घडलं जे इतिहासात आजपर्यंत कधीही घडलं नव्हतं. अभिनेता विल स्मिथने सोहळ्याचं सूत्रसंचालन करणाऱ्या ख्रिस रॉकला कानाखाली मारली आणि सगळीकडेच ऑस्करची चर्चा सुरु झाली. दरम्यान या सर्व घटनेवर विल स्मिथ आणि त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली होती. पण आतापर्यंत मौन बाळगलेल्या ख्रिस रॉकनेही अखेर यावर भाष्य केलं आहे.

ख्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. येताच त्याने एक विनोद केला. ख्रिसने यावेळी विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. यामुळे चिडलेल्या विल स्मिथने थेट स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकच्या कानाखाली मारली. काही वेळासाठी सर्वांना हा स्टंट वाटला, मात्र नंतर हे खरोरखच घडलं असल्याचं लक्षात आलं आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले.

बुधवारी रात्री ख्रिस रॉक बोस्टनमधील एका स्टँडअप शोसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने मंचावर प्रवेश करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं. यानंतर काही वेळाने त्याने उपस्थितांशी संवाद साधला आणि ऑस्करच्या मंचावर विल स्मिथने लगावलेल्या कानाखालीचा उल्लेख केला. ख्रिसने प्रेक्षकांना सांगितलं की, “जे काही झालं त्याबद्दल भाष्य करण्यासाठी माझ्याकडे जास्त काही नाही, त्यामुळे जर तुम्ही त्याबद्दल ऐकण्यासाठी आला असाल तर माझ्याकडे एक पूर्ण शो आहे जो मी या विकेंडच्या आधी लिहिला आहे”.  पुढे त्याने म्हटलं की, “जे काही घडलं ते मी अजूनही पचवत आहे. एखाद्या क्षणी जेव्हा वेळ येईल तेव्हा मी याबद्दल बोलेन आणि ते गंभीर तसंच मजेदार असेल”.

विल स्मिथ इतका का भडकला?

विल स्मिथच्या पत्नीचे नाव जेडा पिंकेट स्मिथ आहे. ऑस्कर सोहळ्यादरम्यान ती विलसोबत प्रेक्षकांमध्ये बसली होती. यावेळी अभिनेता-कॉमेडियन ख्रिस रॉक स्टेजवर आला. त्याने जेडाची खिल्ली उडवली. ख्रिस जेडाला G.I. Jane २ मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे असे यावेळी म्हटले. यावेळी, विल स्मिथ स्टेजवर पोहोचला आणि त्याने ख्रिस रॉकला कानाखाली मारली. स्टेजवरून खाली आल्यानंतर विल स्मिथने ख्रिसला ओरडून सांगितलं की, तुझ्या तोंडून माझ्या पत्नीचे नाव घेऊ नको.