ठाणे : येथील वसंत विहार शाळेत शिकणार्या एका लहान मुलीच्या अपहरणाचा डाव तिच्या आईने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला. परंतु या घटनेमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छोट्या शिशुत शिकणार्या या मुलीस शाळेत सोडण्यासाठी तिची आई खेवरा सर्कलजवळील हाईड पार्क सोसायटीच्या चौकात उभी होती. तेव्हा एक इसम तेथे आला. मोठ्या मुलांना आज सुट्टी दिल्यामुळे फक्त लहान मुलांचीच शाळा भरणार आहे. आणि शाळेनेच आपल्याला मुले आणून सोडण्याचे काम दिले आहे, असे हा इसम महिलेस म्हणाला. मुलीच्या आईला संशय आल्याने तिने त्या इसमास शाळेचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच त्या इसमाने कोणाला तरी फोन लावून हिरानंदानी मेडोजजवळ यायला सांगितले. त्यांचे काय संभाषण झाले हे सांगता येणार नाही, पण तो इसम रागारागात निघून गेला.
हा प्रकार महिलेने तिच्या पतीस सांगितला. ज्या ठिकाणी तो प्रकार घडला तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असून पोलिसांनी या इसमाचा छडा लावावा असे या मुलीच्या वडीलांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
ही बाब गंभीर असून दोन वर्षांनी शाळा सुरू होत असताना पालकांच्या मनात आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेबाबत भीती उत्पन्न होणे चांगले नाही. वसंत विहार शाळेने पालकांकरिता सायंकाळी उशिरा एक पत्रक काढले, असे समजते.