घरातून पळून आलेल्या मुलांना समाजाच्या पाठिंब्याची गरज

आमदार संजय केळकर यांचे आवाहन

ठाणे : वेगवेगळ्या राज्यांतून मुले विविध कारणांमुळे घरातून पळून येत असतात. त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, त्यांचे पुनर्वसन केले नाही तर ती गुन्हेगारी, देशविरोधी कारवायांमध्ये अडकू शकतात. या मुलांच्या पाठीशी समाज म्हणून उभे राहिले पाहिजे,असे आवाहन समतोल फाऊंडेशनचे अध्यक्ष, आमदार संजय केळकर यांनी केले.

समतोल फाऊंडेशनच्यावतीने पुनर्वसन झालेल्या मुलांचा मन कि बात कार्यक्रमाचे आज टाऊन हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. केळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, या मुलांकडे खूप दुर्दम्य इच्छाशक्ती असते. ही मुले पुढे आदर्श नागरिकही होऊ शकतात. मी या संस्थेबरोबर १२ वर्षे जोडलो आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी उचललेले शिवधनुष्य पेलण्यासाठी संपूर्ण टीम काम करत असते. टाऊन हॉलमध्ये नुतनीकरण झाल्यानंतर हा पहिला कार्यक्रम येथे होत असल्याचा मला आनंद होत आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे आणि या वास्तूला पुनर्जीवन मिळावे यासाठी मी खुप झटलो. समाजिक काम करणाऱ्या संस्थांना या ठिकाणी सवलतीच्या दरात चांगला हॉल मिळणार आहे. समतोलच्या माध्यमातून मी स्टेशनवर मुलांशी संवाद साधायचो. समतोलमध्ये ही मुले आल्यावर त्यांच्यावर चांगले संस्कार घडतात. या मुलांना जेव्हा मोठे झाल्यावर कोण व्हायचे असे विचारतो तेव्हा त्यांना सरकारी अधिकारी होण्याची इच्छा ते व्यक्त करतात. समुपदेशनाने इतका सकारात्मक परिणाम होत असतो. पळून आलेली मुले जातात कुठे याचा विचार करण्याची गरज आहे असे आ. केळकर म्हणाले.

यावेळी डिस्ट्रीक्ट चाईल्ड प्रोटेक्शन ऑफीसर रामकृष्णन रेड्डी, परिवहन सदस्य विकास पाटील, समतोलचे संस्थापक विजय जाधव, बाल स्नेहालयचे संचालक मिलिंद वडके व्यासपीठावर उपस्थित होते. गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर समतोलच्या पाच मुलांचे शारदा विद्या मंदिर या शाळेत हस्तांतरण करण्यात आले. या मुलांनी यावेळी त्यांचे मनोगत व्यक्त केले.