ठाणे: बेतवडे येथील खदानीत पोहायला गेलेल्या एका १६ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
गावदेवी रोड, बेतवडे गाव, दिवा या ठिकाणी बुधवारी सकाळच्या सुमारास रोहित राऊत (१६) राहणार शिवगण चाळ, दादुस नगर, दिवा, पूर्व हा मुलगा एका खदानीमध्ये पोहण्याकरिता गेला होता. पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने रोहित राऊत या मुलाचा मृतदेह खदानीमधून बाहेर काढून तो मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने दिवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.