अंबरनाथ: किल्ले भ्रमंतीचा अनोखा छंद असलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या जयंतीनिमित्त किल्ले भ्रमंतीची शंभरी पूर्ण केली. महिन्यातील दोन रविवारी किल्ला सर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
अंबरनाथ नगरपालिकेत डॉ. रसाळ हे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे पनवेल महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार देखील आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी किल्ले भ्रमंतीचा छंद देखील जपण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते व्यस्त दिनक्रम असून देखील वेळ काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड आणि किल्ल्यांना भेट देत आहेत.
शासकीय सेवेत रुजू होण्याआधी डॉ. रसाळ हे सातारा जिल्ह्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करीत होते. 2007 मध्ये त्यांनी मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी इतर शासकीय सेवांसोबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी पदावर असताना शहराच्या विकासाला गती दिली. डॉ . रसाळ यांच्याकडे पनवेल महापालिकेचा आयुक्त पदाचा पदभार असून त्यासोबत ते अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार देखील गेल्या चार वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळत आहेत.
एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीच्या आदल्या दिवशी देखील रसाळ रायगड किल्ल्यावर होते. लग्नाच्या आधी प्रत्येक जण देव दर्शनाला जातो आणि आयुष्याची सुरुवात करतो. मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी देखील रसाळ यांनी रायगडाला भेट देत छत्रपतींचा आशीर्वाद घेतला होता.
आयुष्यात किमान 200 किल्ले सर करण्याचे आपले स्वप्न असून ते स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.