ठाणे: जुनी शाखा पाडून नव्याने बांधण्यात आलेल्या मुंब्र्यातील त्या वादग्रस्त शिवसेना शाखेला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. विशेष म्हणजे या शाखेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाची नोंदणी देखील केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांशी चर्चा देखील केली.
नागरीकांनी टोरंट वीज कंपनीच्या संदर्भात मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचे आश्वासन यावेळी मुंब्र्यातील नागरिकांना दिले. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदार संघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉ.श्रीकांत शिंदे हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंब्र्यातील शिवसेना शाखेला मतदानाच्या एक दिवस आधी दिलेली भेट महत्वाची मनाली जात आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाण्यातील अनेक शाखांवर शिंदे गटाने आपला दावा सांगितला. यामध्ये काही शिवसेना शाखा अजूनही ठाकरे गटाच्या ताब्यात आहेत. मुंब्र्यातील जुनी शाखा जी सुरुवातीला ठाकरे गटाकडे होती त्या शाखेवर शिंदे गटाने दावा सांगितल्यानंतर मुंब्र्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शिंदे गटाकडून ही शाखा जमीनदोस्त करून या ठिकाणी नव्याने शाखा बांधण्यात आली आहे.
याच वादग्रस्त शाखेला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. एका खाजगी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मुंब्र्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या शाखेत जाऊन शाखेची पाहणी केली. तर या ठिकाणी आलेल्या मुस्लिम बांधवांशी चर्चा देखील केली. मुंब्रा परिसरात हा कल्याण लोकसभा मतदार संघात येत असून काही दिवसांपूर्वीच कळव्यात राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत अतिरेकी कारवाईच्या संदर्भातील मुंब्रा कनेक्शनबाबत राज ठाकरे यांनी जाहीर भाष्य केले होते. त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुंब्र्यात हजेरी लावली आहे. टोरंट संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन देऊन मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले. सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असून विकास हाच सरकारचा अजेंडा असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.