ठाणे: येथील बारा बंगला परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या शासकिय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे मंगळवारी रात्री उशिरा समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा पशू संवर्धन विभागाने या बंगल्यापासून एक किलोमिटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या आहेत.
बर्ड फ्ल्यूचा फैलाव केवळ तेवढ्या एका भागापूरताच मर्यादित असून त्याचा इतरत्र कुठेही फैलाव झाला नसल्याचे पशू संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बंगल्याच्या आवारात ४० ते ५० कोंबड्या पाळल्या होत्या. यातील काही कोंबड्यांची मागील आठवड्यापासून अचानक मरतुक सुरू झाली. यामुळे पक्ष्यांना कोणतीतरी बाधा झाले असल्याचे निदर्शनास आले. पशू संवर्धन विभागाने मेलेल्या पक्ष्यांचे काही नमुने चाचणीसाठी पाठविले. याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा मिळाला. यामध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पशू संवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बारा बंगला परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या आहेत.
बर्ड फ्लुची लागण झाल्याचे निष्पन्न होताच एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. याचा शहरात किंवा आसपासच्या परिसरात इतरत्र कुठेही फैलाव झालेला नाही, अशी माहिती जिल्हा पशू संवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.वल्लभ जोशी यांनी दिली.