ठाण्यातील तिघांचा समावेश
मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
ठाणे: ठाण्याचे हेमंत जाधव, संदीप मोकाशी आणि धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील संतोष दगडे असा चार जणांचा चमू उद्या 1 एप्रिलपासून माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यासाठी रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चमूला भारतीय ध्वज देऊन मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोहिमेसाठी मुंबईमार्गे काठमांडू नेपाळला रवाना होणार आहेत.
ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व हे करणार आहेत. या मोहिमेचे प्रमुख बदलापूरचे हेमंत जाधव आहेत. ते मध्य रेल्वेत अभियांत्रिकी विभागात तर डोंबिवलीकर असलेले संदीप मोकाशी देखील मध्य रेल्वेमध्ये विद्युत विभागात आहेत. ठाण्यातील माजिवडा येथील धनाजी जाधव हे बँकेत कार्यरत असून कर्जत निवासी संतोष दगडे हे व्यावसायिक आहेत.
या साहसी क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले हे अनुभवी गियार्रोहक आहेत. एनआयएम (निम) आणि एचएमआय येथून त्यांनी मूलभूत, प्रगत, शोध आणि बचावक्रम अभ्यासक्रमांसह व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर एव्हरेस्ट लिलया करणार आहोत, असा विश्वास त्यांनी बाळगला आहे. शिवाय अनेक विद्यार्थी, मित्र आणि नातेवाईक यांना निसर्गाशी जोडण्यासाठी ते प्रेरणादायी आहेत.
ही मोहिम १ एप्रिल ते २७ मे अशी तब्बल दोन महिन्यांची आहे. याकरीता सुमारे ३० ते ३५ लाख रुपये प्रत्येकी खर्च येणार आहे. शिखर चढण्याची इच्छा प्रबळ असल्यामुळे सर्वांनी पैशांची जमवाजमव केली असली तरी अजून निधीची आवश्यकता आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन या गियार्रोहकानी केले आहे. यासाठी ९८३३५५८१२८ या क्रमांकावर संपर्क करावा.
या उत्तुंग शिखरावर जाण्यासाठी शारीरिक मनोबल आणि आर्थिक बाब खूप महत्त्वाचे आहे. हा सर्व ताळमेळ साधून या मोहिमांमागे छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच प्रेरणादायी असल्याचे सांगत, हे सर्व गियार्रोहक आता जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट- ८८४८.८६मीटर( २९०३१ फूट) चढण्यासाठी सज्ज आहेत.
ऑगस्ट २०२२ मध्ये कारगिलमधील तांत्रिक आणि अवघड असलेले ७ हजार १३५ मीटर उंच माउंट नून शिखर आणि शिवाय त्यांनी १२हून अधिक सहा हजार मीटरवरील हिमालयीन शिखरे सर केली आहेत, अशी माहिती हेमंत जाधव यांनी दिली.