नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न दृष्टीपथात
नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वर धावणाऱ्या मेट्रोची चाचणी सेंट्रल पार्क ते बेलापूर या स्थानकांदरम्यान शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 रोजी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो, डॉ. के. एम. गोडबोले, मुख्य अभियंता (नवी मुंबई), सिडको, संतोष ओंभासे, अधीक्षक अभियंता, (नैना व मेट्रो), सिडको, सुनील गुज्जेलवार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांचे तांत्रिक सल्लागार, अनुप अग्रवाल, कार्यकारी संचालक, महा मेट्रो आणि रीतेश गर्ग, प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, महा मेट्रो हे उपस्थित होते.
“यापूर्वी पहिल्या टप्प्यात मार्ग क्र. १ वरील सेंट्रल पार्क ते पेंधर स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली असून या मार्गाकरिता सीएमआरएस यांची मंजुरीही मिळाली आहे. आता सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यानही मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे. यामुळे संपूर्ण मार्ग क्र. 1 आता लवकरच प्रवासी वाहतुकीकरिता खुला होणार असल्याने नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे, अशी माहिती डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत. मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर हा 11 किमी लांबीचा व 11 स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून लवकरच सर्व 11 स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज होणार आहेत.
सिडकोतर्फे मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महा मेट्रोची अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महा मेट्रो हा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम असून नागपूर आणि पुणे येथील मेट्रो मार्गांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी महा मेट्रोतर्फे करण्यात आली आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी सिडको आणि महा मेट्रोच्या देखरेखीखाली मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क (स्थानक क्र. 7) ते बेलापूर (स्थानक क्र. 1) या स्थानकांदरम्यान, 5.96 किमी लांबीच्या टप्प्यात दुपारी 1 वाजता अप आणि डाऊन मार्गावर घेण्यात आलेली मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली आहे.