डोंबिवली : कल्याण-शिळ मार्गावरील सुचकनाक्यावर असलेल्या एका कापडाच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या चार महिला आणि एक पुरुषाने दुकानदारांची नजर चुकवून १८ हजार रुपये किंमतीच्या साड्या आणि ड्रेस मटेरियल चोरल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
टाटा पॉवर अर्थात सुचकनाका परिसरामध्ये निशा वाघ यांच्या मालकीचे मैत्रीण बुटीक नावाचे साडी आणि ड्रेस मटेरियलचे दुकान आहे. या दुकानात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास चार महिला आणि एक पुरुष ग्राहक बनून आले. दुकानात काम करणाऱ्या महिला कपडे दाखविण्यात असताना चोरट्या महिला दुकानातील लेडीज ड्रेस मटेरियल आणि साड्या असा सुमारे १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पळून गेल्या. ही बाब दुकानातील कामगार पुन्हा माल लावत असताना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, ग्राहक म्हणून आलेल्या त्या चार महिला आणि एक पुरुष दुकानातील कुर्ती आणि साड्या चोरीत असल्याचे दिसून आले.
दुकानाच्या मालकीन निशा वाघ यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. याच दरम्यान अशाच प्रकारे त्या मार्गावर आणखीन दोन-चार दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या साडीचोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.