केटरिंग उद्योजक सुनील कर्णिक यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील सुप्रसिद्ध कॅटरर व लोकप्रिय व्यक्तिमत्व सुनील उर्फ भाई कर्णिक यांचे आज सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते.

तीन दिवसांपूर्वीच आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यावरील उपचारासाठी त्याला ज्यूपीटर हाॅस्पीटल येथे दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यानच प्रकृती खालावल्याने आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेली पस्तीस चाळीस वर्ष केटरिंग क्षेत्रात कार्यरत राहून लाखो ठाणेकरांच्या पसंतीस उतरलेले भाई कर्णिक हे एक अत्यंत मनमिळाऊ आणि सदैव हसतमुख असे व्यक्तीमत्व होते. घरगुती कार्यक्रम असो वा एखादा भव्यदिव्य विवाहसोहळा, सुनील कर्णिक यांच्यावर सोपवला की कार्याची चिंता मिटली हे सांगणारी हजारो कुटुंब मिळतील. आपल्या ग्राहक आणि आपले समव्यावसायिक यांचेबरोबर भाईंचे अतिशय मित्रत्वाचे संबध होते. सुनील यांच्या जाण्याने सीकेपी समाजातील एक हरहुन्नरी आणि मदतीला तत्पर असणारे एक व्यक्तिमत्व हरपले आहे. जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा शेकडो ठाणेकर त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी उपस्थित होते. भाई कर्णिक यांच्या पाठी पत्नी व एक कन्या असा परिवार आहे.