न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या ३६ गाळेधारकांविरोधात खटला

भाईंदर: अनधिकृत बांधकाम विरोधातील पालिकेच्या कारवाई कारवाईला आळा घालण्यासाठी ठाणे न्यायालयात बोगस इमारत बांधकाम आराखडा दाखल करून स्थगिती आदेश मिळविणाऱ्या ‘ओसवाल आॅर्नेट’ टाॅवरमधील ३६ गाळेधारकांविरोधात महापालिका विधी विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार असल्याने सदर खटल्याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

भाईंदर पूर्वेस जेसलपार्क परिसरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करुन व बांधकाम आराखड्यात मंजूर बांधकामाव्यतिरिक्त बांधकाम करुन बांधण्यात आलेल्या ‘ओसवाल आॅर्नेट’ या सात मजली टाॅवर विरोधात शिजाॅय मॅथ्यू यांनी मागील ३ वर्षांपासून आवाज उठविला. वर्षानुवर्षे पाठपुरावा केल्यानंतर व न्यायालयीन आदेश पारित झाल्याने मिराभाईंदर महापालिका प्रभाग कार्यालय क्र. ३ च्या प्रभाग अधिकाऱ्यासह अनधिकृत बांधकाम विभागातर्फे अनधिकृत गाळ्यांविरोधात पालिकेची कारवाई सुरू झाली. कारवाई थांबविण्यासाठी ओसवाल आॅर्नेटमधील सुमारे ३६ गाळेधारकांनी ठाणे न्यायालयात दावा दाखल करुन स्थगिती आदेश मिळविला. याबाबत न्यायालयातून प्राप्त दस्तऐवज तपासणी केली असता सदर दाव्यामधे ठाणे न्यायालयास पालिकेने मंजूर बांधकाम आराखड्याऐवजी दुसराच आराखडा सादर केल्याचे शिजाॅय मॅथ्यू यांना आढळून आले. सदर प्रकार महापालिका विधी विभागाच्या निदर्शनास आणल्यावर विधी विभागाने नगररचना विभागाकडून अभिप्राय मागविला.

नगररचना अधिकारी हेमंत ठाकूर यांनी ठाणे न्यायालयात दाखल बांधकाम आराखडा नगररचना विभागाकडून पारित केला नसल्याचा स्पष्ट अभिप्राय विधी विभागास सादर केला. अखेर विधी विभागाने सदर प्रकरण ठाणे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी ओसवाल आॅर्नेट टाॅवर मधील स्थगिती आदेश मिळविणाऱ्या सुमारे ३६ गाळेधारकांविरोधात दावा दाखल केला आहे. पुढील सुनावणी १५ जून रोजी ठेवण्यात आली असल्याने परिसरातील रहिवाशांचे सदर सुनावणीकडे लक्ष लागले आहे.