ठाणे : घोडबंदरमध्ये बेकायदा फ्लेक्स लावून परिसर विद्रुपीकरण करून शहराच्या सौंदर्याला बाधा आणल्याने भाजपचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन ठाणे शहर अध्यक्ष मनोहर डुंबरे आणि त्याच्या पत्नी भावना डुंबरे यांच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे शहरात विशेषतः घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पद्धतीने बॅनरबाजी केली जात आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या बॅनरबाजी करण्यात येत आहे. भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी कृत्रिम तलावांच्या सभोवताली बॅनरबाजी करून गणेश विसर्जनासाठी आपण व्यवस्था केली असल्याचे बॅनर लावले आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून संबंधित माजी नगरसेवकास दंड आकारावा आणि ठामपाच्या महसुलात वाढ करावी; अन्यथा, कोकण आयुक्तांसमोर उपोषणाला बसू, असा इशारा अशोक सोनावळे यांनी दिला होता. दरम्यान, मनोहर डुंबरे व त्यांची पत्नी भावना डुंबरे यांच्यावर अनधिकृत पोस्टर व बॅनर लावून शहराचा विद्रुपीकरण करणेबाबत महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने गुन्हा दाखल केला आहे.
घोडबंदर क्षेत्रातील पातलीपाडा ब्रिज खाली, पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम याठिकाणी लोखंडी रेलीगवर दहीहंडीनिमित्त तसेच ऋतू इस्टेट सर्कल, पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम या ठिकाणी फुटपाथ संलग्न लोखंडी रेलींगवर अर्पण फाऊंडेशन ट्रस्टतर्फे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे बेकायदा फ्लेक्स लावून शहर विद्रुपीकरण केल्याचे दिसून आले.