प्रचारासाठी मिळणार दोन आठवडे
ठाणे: ठाणे, मुंबईसह शेवटच्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना तीन सुट्ट्यांमुळे अवघे पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. तर प्रचारासाठी अवघे १२ दिवस मिळणार आहेत.
उद्यापासून पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ही माहिती दिली २६ एप्रिल ते ३ मे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. ४ मे रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे तर ६ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. ते पुढे म्हणाले कि २६, २९, ३० एप्रिल, २ आणि ३ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २७, २८ एप्रिल रोजी शनिवार आणि रविवारी तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने या दिवसात निवडणूक संदर्भातील कोणतेही कामकाज होणार नाही, त्यामुळे अवघे पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात १९३३ ठिकाणी ६५९२ मतदार केंद्रे असून त्यापैकी सहा मतदार केंद्र संवेदनशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णायक अधिकारी श्री.शिनगारे यांनी दिली.
या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील मोजणी घोडबंदर मार्गांवरील कासारवडवली येथिल न्यू होराईझन शाळेत केली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी डोंबिवली येथिल सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलमधील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात होणार आहे तर भिवंडी लोकसभा मतदार संघातील मतमोजणी भिवंडी येथिल सावद गावामधील कुड बिसनेस सेंटरमध्ये होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सांगितले.
महायुतीची तारांबळ उडणार
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात आघाडी घेत असताना भिवंडी वगळता ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाहीत. कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रचार सुरू केला असला तरी ठाण्यात अद्याप उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस आणि प्रचारासाठी १२ दिवस मिळणार असल्याने महायुतीची तारांबळ उडणार असल्याचे बोलले जाते.