मुरबाड : शिवसेनेचे बदलापूर नगरपरिषदेतील नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांची मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी निवड होताच, वडनेरे यांनी मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी जनसंपर्क सुरु केला आहे. काल ते मुरबाड येथे कार्यकर्ते व पत्रकारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले होते.
बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक असतांनाही मुरबाड तालुक्यात आपल्या विविध उपक्रमांनी मुरबाडकर जनतेवर वेगळाच ठसा उमटवणाऱ्या शैलेश वडनेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारी आल्याने पुन्हा एकदा शैलेश वडनेरे ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आज मुरबाडमधील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी वर्गाशी संवाद साधत पत्रकारांशी औपचारिक चर्चा केली.
कुळगाव बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत बदलापूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या मुरबाड तालुक्यातील लोकोपयोगी उपक्रमांमुळे त्यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने तात्काळ मुरबाड विधानसभा अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी सद्या दिली आहे. पत्रकारांशी बोलताना वडनेरे यांनी सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्ष सज्ज होत आहे. गट व गणनिहाय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांना बळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असून जनतेची सेवा करून त्यांचे प्रश्न सोडवणे व त्यांची कामे करणे हेच प्रमुख धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम सासे, महिला तालुका अध्यक्षा योगिता शिर्के, शहर अध्यक्ष दीपक वाघचौडे, सामाजिक न्यायचे संतोष बाईत, रविंद्र केंबारी, नरेश म्हाडसे, संजय हिंदुराव, बाळू भोईर, दिलीप शेळके, हर्षद शेळके, अभिजित शिंदे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.