मनसेने मागितली हनुमान चालीसा पठनाची परवानगी
ठाणे : मनसेचे राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या जाहीर भूमिकेनंतर मुंब्र्यात एक संघटनेच्या नेत्याने माथी भडकवणारी विधाने केली होती. तो तरुण माथेफिरू असून मुंब्र्यात हिंदू- मुस्लिम समाजाने शांततेचा मार्ग अवलंबवावा, असे आवाहन येथील मौलवींनी केले आहे. तर ४ मे रोजी भोंगे खाली उतरवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा पठन करू, असा इशारा ठाण्यात मनसेने दिला आहे.
इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म आहे. त्यामुळे आम्ही इतरांच्या धर्मांमध्ये हस्तक्षेप करीत नाही. एखादा मुस्लीम तरुण जर बोलत असेल तर तो सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व करीत नाही. तत्कालीक प्रसिद्धीसाठी तो अशी विधाने करीत आहे. त्याचे हे वाक्य समस्त मुस्लीम धर्मियांसाठी लागू होत नाही. त्यामुळे त्याची आम्ही सर्वांनी निंदा केलेलीच आहे. आमचा धर्म शांतता शिकवत असल्याने संविधानिक मार्ग, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक प्रणाली आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या पलिकडे आम्ही जाणार नाही, अशी भूमिका मुंब्रा येथील सर्व मौलवींनी मांडली.
मुंब्रा येथील मुस्लीम समुदायाने अत्यंत सामोपचाराची भूमिका घेत तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने मौलाना अब सलाम, मुफ्ती अश्रफ, मौलाना रफिक अजमल, मौलाना अजहर, मौलाना वहाब कासीम, मौलाना सफिक अजमल, मौलाना अजहर, मोलाना फैसल, हाफिज अयुब, मौलाना सियाफुल, मुफ्ती अब बसीत, मौलाना रिझवी, हाफिज शाकिर कादरी, मौलाना शफिक नादवी, डॉ. राऊत, डॉ. काझीशाहब, मौलाना मदनी यांच्या पुढाकाराने मुंब्रा येथील सुमारे 60 ते 70 मौलवींनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत मुस्लीम समुदायासह सर्वांनाच शांततेचे आवाहन केले आहे.
ज्या कोणी तरुणाने माथी भडकवणारी विधाने केली आहेत; तो तरुण सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठीत नाही. अल्लाहू-अकबर ही घोषणाच मूळात देव हा सर्व शक्तीमान, सर्वश्रेष्ठ आहे, मग, देव हा कोणत्याही धर्माचा असू दे; तोच सर्वशक्तीमान आहे. हेच सांगणारी आहे. असेही यावेळी या सर्व मौलवींनी सांगितले.
भोंगे उतरवा अन्यथा, ४ मे पासून मशिदीसमोर हनुमान चालिसा
ठाण्यात मनसे भूमिकेवर ठाम
ठाणे: मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत न उतरविल्यास देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्याअनुषंगाने, ठाण्यातील मनसे आक्रमक झाली आहे.
मुंब्रा-कौसा येथील जामा मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत न काढल्यास ४ मे रोजी मशिदीसमोर भोंगा लावुन हनुमान चालिसा म्हणण्याची परवानगी द्या, अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे. कौसा येथील जामा मशीद ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मशीद मानली जाते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत भोंगे उतरवण्याबाबत ३ मे पर्यंत मुदत दिली होती. अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकीकडे राजकारण ढवळुन निघाले असताना ठाकरे सरकारने भोंगे उतरण्यास नकारार्थी सूर लावला. तरीही,मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असुन ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट मुंब्य्रातील जामा मशीदीसमोरच हनुमान चालिसा म्हणण्याचा इरादा जाहिर केला आहे. या पार्श्वभूमीवर ३ मे पर्यत मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास ४ मे रोजी सकाळपासून हनुमान चालीसा पठण करण्यासाठी भोंगे लावण्याची परवानगी मुंब्रा पोलिसांकडे पत्राद्वारे मागितली आहे.सकाळी ६ वाजता, दुपारी १ वाजता, सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजता हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी बोलुन दाखवला.त्यामुळे, मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलिसांसमोर मात्र मोठा पेच उभा ठाकला आहे.
उत्तरप्रदेशात भोंगे उतरले मग महाराष्ट्रात का नाही?
मुंब्र्यामधील जामा मशीदीसमोर ४ मे रोजी हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी मागितली आहे. हा एक सामाजिक विषय असून कायदा सर्वाना सारखा आहे. त्यांना जर परवानगी दिली असेल तर आम्हाला देखील परवानगी दिली पाहिजे. सरकारने सर्वांसाठी एकच नियम ठेवावा.आम्हाला परवानगी देणार नसाल तर त्यांचे भोंगे उतरवा. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले तर महाराष्ट्रात भोंगे का उतरवत नाहीत? इतरवेळी अधिकाराचा गैरवापर करता मग इथेही करा. बाळासाहेबांनी सांगितले होते की, मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत आता त्यांच्या मुलाचे सरकार आहे. बाबांचा शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्री झाले ना ? मग बाबांचा शब्द पाळण्यासाठी त्यांनी मशिदीवरील भोंगे देखील उतरवावेत. अशी बोचरी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
औरंगाबादसाठी ठाण्यातुन २०० गाड्या
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील जंगी सभेसाठी मनसेची जय्यत तयारी सुरु आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर सगळ्यात मोठी सभा होणार असेल तर ती म्हणजे राज ठाकरे यांची होणार आहे. औरंगाबादला ठाण्यातून महाराष्ट्र सैनिकांच्या २०० गाड्या जाणार असून राज ठाकरे तिथे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.