प्रकाश पादुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार

नवी दिल्ली : जागतिक बॅडिमटन महासंघाचा (बीडब्ल्यूएफ) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा भारताचे महान बॅडिमटनपटू प्रकाश पादुकोण यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी भारतीय बॅडिमटन संघटनेकडून पादुकोण यांचे नाव पाठवण्यात आले होते. त्यानंतर पुरस्कार समितीच्या शिफारशीनुसार, जागतिक बॅडिमटन महासंघाने पादुकोण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारे माजी बॅडिमटनपटू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदक जिंकून देणाऱ्या पादुकोण यांनी बॅडिमटन खेळाला मोठे योगदान दिले आहे. २०१८मध्ये त्यांना भारतीय बॅडिमटन संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. विशेष सेवा पुरस्कारासाठी ‘बीडब्ल्यूएफ’कडून देवेंदर सिंग (हरयाणा बॅडिमटन संघटनेचे अध्यक्ष), एस. ए. शेट्टी (महाराष्ट्र बॅडिमटन संघटनेचे सचिव), डॉ. ओ. डी. शर्मा (भारतीय बॅडिमटन संघटनेचे उपाध्यक्ष) आणि माणिक साहा (माजी प्रशासक) यांना नामांकने देण्यात आली आहेत.