बर्निंग कारमुळे पूर्व दृतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे : घाटकोपर येथून घोडबंदरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांने नितीन कंपनीजवळ अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे पूर्वद्रुतगती मार्गावर सुमारे पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कोपरी उड्डाणपुलावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घाटकोपर येथून ठाण्याच्या घोडबंदर येथील वाघबीळकडे ही गाडी जात होती. नितीन कंपनी उड्डाणपुलावर अचानक आग लागली. या वाहनात असलेले डेकोरेशनचे साहित्य आगीमुळे तत्काळ पेटले. सुदैवाने वाहन चालकाने गाडीबाहेर धाव घेतल्याने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. या आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या ‘बर्निंग कार’मुळे पूर्व दृतगती महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला.

आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु असल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक खालील रस्त्यावरून वळवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली. अखेर आग नियंत्रणात आणताच अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी ही चारचाकी टोइंग वाहनाच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला केल्याने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. तोपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा कोपरी उड्डाणपुलापर्यंत लागल्या होत्या. त्याचा फटका कामावरून परतणाऱ्या नोकरदारांना बसला.