शहापूर-मुरबाड ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा

शहापूर: ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यात मोबाईल नेटवर्कची विशेषतः जिओ नेटवर्कची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क अत्यंत कमजोर असल्याने फोनवर नीट संभाषण होत नाही, तर महत्वाचे मेसेज वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना फोन कॉल दरम्यान आवाज तुटणे, कॉल अचानक बंद होणे, इंटरनेट सेवा बंद पडणे अशा समस्यांना रोज सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शैक्षणिक, बँकिंग, शासकीय कामे आणि ऑनलाईन सेवांसाठी मोबाईल नेटवर्क अत्यावश्यक बनले असताना ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत आहे.

आपत्कालीन परिस्थितीतही वेळेवर संपर्क साधता येत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. तत्काळ निरोप द्यायचा असला तरी नेटवर्क मिळत नाही. अनेकदा महत्वाचे फोन आणि ओटीपी मेसेज मिस होतात. अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

डोंगराळ आणि दुर्गम भागात मोबाईल टॉवरची संख्या अपुरी असल्यामुळे ही समस्या अधिक तीव्र असल्याचे सांगितले जात आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना नेटवर्क मिळवण्यासाठी घराबाहेर किंवा उंच ठिकाणी जावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान संबंधित मोबाईल सेवा कंपन्या आणि दूरसंचार विभागाने तातडीने अतिरिक्त टॉवर उभारून नेटवर्क सेवा सुधारावी, अशी मागणी शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील मोबाईलधारकांकडून होत आहे.