* १०८० ठिकाणी राबविणार योजना
* एक खड्डा जिरवणार साडेतीन लाख लिटर पाणी
ठाणे: कॅच द रेन्स व्हेन इट फॉल्स व्हेअर इट फॉल्स ही संकल्पना राबविण्याकरिता पावसापासून उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करण्यासाठी शेत जमिनीच्या प्रत्येक एक एकर शेतीमधील उताराच्या ठिकाणी जलतारा संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी दिली.
पडणाऱ्या पावसाचे ३५ टक्के पाणी वाहून जाते, हे वाहुन जाणारे पाणी जलतारा उपचार माध्यमातून पाणी अडवून जिरवणे शक्य होत आहे. यामुळे सिंचन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होते. तसेच अतिरीक्त पाण्यामुळे जमीन चिबड होण्यापासून बचाव होतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेचा मूलभूत उद्देश ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना अकुशल कामाची मागणी केल्यानंतर कामे उपलब्ध करून देणे आहे. तसेच जलताराच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यास उपलब्ध करणे हा मुख्य हेतू आहे.
जलतारा संकल्पनेनुसार शेताच्या निवड केलेल्या उतार भागात पाच फुट (रुंदी) X पाच फुट (लांबी) X सहा फुट खोलीचा म्हणजे दीड मी. X दीड मी. X १.८०.मी) आकाराचा एक खड्डा तयार करण्यात येतो.
हा खड्डा मोठ्या आकाराच्या कठीण प्रकारच्या (टोळ) प्राधान्याने ८० मि. मी. तसेच १०० मि. मी. आकाराच्या दगडांनी भरण्यात येतो. एक जलतारा खड्डा चार महिन्यांत ३.६० लक्ष लिटर पाणी जमीनीमध्ये मुरवतो.
यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस कमी पडण्याचा अंदाज असल्याने पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याचे व त्याकरिता ठाणे जिल्ह्यात १०८० जलतारा तयार करण्याचे नियोजन कृषि विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे. जास्तीत जास्त जलतारा खोदण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.