* रविवारी पुन्हा मिळणार शेकडो महिलांना लाभ
* पादत्राणांपासून मोबाईल खरेदीवर १५ ते ५० टक्के सूट
* आमदार संजय केळकर यांचा उपक्रम
ठाणे : आमदार संजय केळकर यांनी स्थापन केलेल्या महिला विकास परिवार संस्थेच्या जनकल्याण स्मार्ट कार्ड योजनेला विविध घटकांतील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असून रविवार २२ सप्टेंबर रोजी महाजनवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमात देखील शेकडो महिलांना याचा लाभ मिळणार आहे. महिलांना शंभरहून अधिक दुकानांमध्ये १५ ते ५० टक्के सूट मिळत असल्याने महिलांचे घरातील आर्थिक गणित जुळू लागले आहे.
केंद्रासह राज्याने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या असून त्याचा लाभ लाखो महिलांना मिळत आहे. आमदार संजय केळकर यांनी स्थापन केलेल्या महिला विकास परिवार या संस्थेच्या मार्फत ठाण्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यातून शेकडो महिलांना रोजगार मिळत आहे.
या संस्थेच्या माध्यमातून जनकल्याण स्मार्ट कार्ड योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ८० हून अधिक व्यापारी सहभागी झाले असून महिलांना विविध दुकानांतून १५ ते ५० टक्के सूट मिळत आहे. पादत्राणे, ड्रेस मटेरियल, साड्या, इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल, ज्वेलरी आदी दुकाने आणि शोरुमचा यात सहभाग आहे. आणखी अनेक व्यापारी या योजनेत सहभागी होत असल्याने हजारो महिलांना याचा लाभ मिळत आहे.
या योजनेचा शुभारंभ भगवती मैदान येथे १ सप्टेंबर रोजी आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. यावेळी भाजपचे व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शाह, पंढरीनाथ पवार, ॲड. सुभाष काळे, सीताराम राणे, विकास पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमात दोन हजारहून अधिक महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले होते. येत्या रविवारी २२ सप्टेंबर रोजी महाजन वाडी, खारकर आळी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सुमारे अडीच हजार महिलांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू महिलांनी संस्थेकडे नोंदणी करावी. महिलांना स्मार्ट कार्ड बरोबरच अनेक दुकाने, आस्थापना आणि शोरुमची यादी असलेली पुस्तिका देण्यात येईल. यातील कोणत्याही दुकानात स्मार्ट कार्ड दाखविल्यास महिलांना भरघोस सूट मिळणार आहे.