गुंडांवर कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका – मुख्यमंत्री
आनंद कांबळे/ठाणे
ठाणे जिल्ह्यासह राज्यात वाढलेल्या गुंडगिरीविरोधात कोणाच्याही दबावाला बळी न पडता कडक कारवाई करावी तसेच दिलेल्या पोलिस संरक्षणाची पडताळणी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता मुख्यमंत्री श्री. फडणविस ठाण्यात आले होते. त्यापूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज्यातील गुंडांच्या विरोधात कडक कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा ठेऊ नका, गुन्हेगारी वाढणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यातील जनतेला पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा, असे आदेश दिले होते तसेच पोलिस संरक्षण दिलेल्या व्यक्तींची पडताळणी करून ज्यांना खरोखर आवश्यक आहे अशाच लोकांना पोलिस संरक्षण द्यावे, अशा सूचना देखिल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या बैठकीत दिले असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
ठाणे जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी विनयभंग, बलात्कार, अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यावर देखिल चाप लावण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. फडणविस यांनी दिले आहेत. राज्यात गुंडगिरी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करून गुंडांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय आशिर्वादामुळे ठाण्यातील गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे, अशी तक्रार ठाण्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याची देखिल दखल या बैठकीत घेण्यात आली असल्याचे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.