ठाणे: जुन्या ठाण्यातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सिडको ते कळवा नवीन उड्डाणपूल येथे तिसरा सॅटिस पूल उभारण्याची मागणी भाजपचे प्रदेश सचिव ॲड. संदीप लेले यांनी केली आहे
ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना श्री. लेले यांनी लेखी निवेदन दिले आहे. ठामपाने ठाणे पश्चिम येथे सॅटिस पूल उभारून काही प्रमाणात वाहतुकोंडीतून ठाणेकरांची सुटका केली आहे. पूर्व भागात देखील दुसऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे, त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. मीरा-भाईंदर, वसई, नवी मुंबई आणि मुंबई येथे बसने ठाणेकरांना प्रवास करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे सिडको येथे सॅटिस पूल उभारून नवी मुंबई आणि मुंब्रा येथे जाण्यासाठी उन्नत मार्ग उभारून तो नवीन कळवा पुलाला जोडण्यात यावा त्यामुळे खारटन रोड, महागिरी, स्टेशन परिसर या भागातील नागरिकांची आणि ठाणे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी श्री. लेले यांनी केली आहे.