प्रियकराकडून प्रेयसीची निर्घृण हत्या; आरोपीला अटक

ठाणे : दोघांमध्ये झालेल्या वादात प्रियकराने 34 वर्षीय प्रेयसीवर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केल्याची घटना वागळे इस्टेट भागातील किसननगर येथे सोमवारी पहाटे घडली.

या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी प्रियकरास अटक केली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश ठाकूर (35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वागळे इस्टेट येथील किसननगरात राहणारा गणेश ठाकूर आणि मयत महिला सुनीता कांबळे (34) हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत. सोमवारी (20 मार्च) पहाटे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या गणेश ठाकूर याने सुनीताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने वार करून तिचा खून केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन काब्दुले, श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीस वागळे इस्टेट परिसरातून अटक केली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.