तुटलेले बेंच, गळक्या भिंती

ठाणे: पातलीपाडा येथे एकाच इमारतीमध्ये ठाणे महापालिकेच्या तब्बल चार शाळा भरत असून या चारही शाळांची पटसंख्या जवळपास १७०० च्या वर आहे. मात्र त्या तुलनेत सुविधांची वानवा असून पावसात भिंतीही गळू लागल्या आहेत.

ठाण्यातील घोडबंदर पातलीपाडा परिसरात असलेली पालिकेची शाळा ही ग्रामपंचायत काळातील अतिशय जुनी शाळा आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर ही शाळा महापालिकेकडे सोपवण्यात आली. मात्र असुविधांचा सामना करत विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानाचे धडे घ्यावे लागत आहेत. तळ अधिक दोन मजल्याची ही इमारत असून या ठिकाणी शाळा क्रमांक २१,२५, ५३ आणि ५४ अशा चार शाळा भरतात. प्रत्येक वर्गात ६० विद्यार्थी जरी धरले तरी ही संख्या १७०० च्या घरात जाते. या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तसेच माध्यमिकचे वर्ग देखील भरतात. मात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत जागा अतिशय अपुरी पडत असल्याने मुलांना बसवायचे कुठे असा प्रश्न या शाळेतील शिक्षकांना पडला आहे.

गेले अनेक वर्ष या शाळेसाठी सामाजिक कार्यकर्ते डी.जे.बक्षी यासाठी पाठपुरवठा करत आहेत. मात्र त्यांनाही प्रशासन दाद देत नाही. या शाळेतील विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. आणखी सुविधा दिल्या तर आणखीन हुशार विद्यार्थी शाळेत घडतील. शाळेच्या छतावर अतिरिक्त चार ते पाच खोल्या तयार होऊ शकतात. शाळेच्या जिन्यावरील लाद्या तुटल्या असल्याने विद्यार्थी पडण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी भिंतींना गळती लागली आहे. शौचालयाची दारे तुटली आहेतं. कोट्यवधी रुपयांची तरतूद शाळांसाठी केली जाते. मात्र हे पैसे जातात कुठे असा सवाल जागरूक नागरिक विचारत आहेत.

याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले श्रावण मोहोळे यांनीही पाठपुरावा करून ही शाळा दहावीपर्यंत केली. शाळा दहावीपर्यंत झाली मात्र विद्यार्थ्याना बसायला जागा नाही, साधी प्रयोगशाळा देखील नाही. खासगी शाळांशी स्पर्धा करण्याचा संकल्प मांडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या या शाळेत मात्र बसायला जागा नाही, तुटलेली शौचालयाची दारे , शौचालयात पाणी नसणे, तुटलेले बेंच, गळक्या भिंती या समस्यांशी विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे.