बाजूचे दुकान भाड्याने घेऊन सराफाचे दुकान फोडले

कोपरीत भरदिवसाची घटना

ठाणे : ठाणे पूर्व कोपरी विभागातील भरवस्तीत असलेल्या भवानी ज्वेलर्सचे दुकान ऐन दुपारी दोन वाजता चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी त्वरीत शोध घेतल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पूर्व विभागातील नारायण कोळी चौकात ही घटना झाल्याचे कळताच स्थानिक रहिवाशांना धक्काच बसला. कारण हे दुकान मोक्याच्या ठिकाणी असूनही चोरी कशी झाली, याची चर्चा स्थानिक रहिवाशांत सुरु आहे. एका उत्तुंग इमारतीच्या आणि बँकेच्या नजिकच ही पेढी आहे. या भागात असलेली लहान दुकाने एकमेकांना खेटून आहेत. कारण, या पेढीलाच खेटून एक फर्निचरचे दुकान असल्यामुळे त्याची संधी चोराने साधली. चोराने फर्निचर दुकानाची भिंत फोडून पेढीत प्रवेश केला आणि तेथे असलेल्या लॉकरमधून ८० ग्रॅम तोळ्याचा माल चोरला तसेच रोख रक्कमही लंपास केल्याचे कळते.

दरोडेखोरांनी तीन दिवसांपूर्वी ज्वेलर्सच्या दुकानाजवळचे दुकान भाड्याने घेऊन त्याला भगदाड पाडून फर्निचरचे सुतारकाम सुरू केल्याचा बनाव केला. या भागातील सर्व दुकाने सोमवारी दिवसभर बंद असल्याचा फायदा घेऊन संधी साधली. कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक ममता डिसोझा आणि त्यांच्या अधिकारी, पोलीस पथकाने ही घटना कळताच दुकानफोड्याला अटक केली आहे. त्याला घरफोडीच्या गुन्ह्यातंर्गत अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.