ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेनेची बैठक
ठाणे: युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची अत्यंत महत्त्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील अनंत बँक्वेट्समध्ये पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पुर्वेश सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून खासदार नरेश म्हस्के यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात युवासेनेचे मोठे श्रेय आहे. विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. मागील अडीच वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला. मुख्यमंत्री महोदय १८-१८ तास काम करतात. अडीच वर्षे त्यांनी आपल्याला ताकद दिली. आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले पाहिजे, असे आवाहन युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी युवा सैनिकांना केले.
मुख्यमंत्र्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना दर महिना दीड हजार रुपये खात्यात जमा होत आहे. या योजनेला संपूर्ण राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आणलेल्या या योजना आपल्या युवा सैनिकांनी घरोघरी पोहचवल्या पाहिजेत. पुढील ४५ दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक युवा सैनिकांनी दिवसातील एक तास हा संघटना वाढवण्यासाठी द्यावा. सर्व युवा सैनिकांनी शाखा संपर्क अभियानात सक्रीय सहभाग घेऊन युवा सेना बळकट करावी, असे पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर युवा सैनिकांनी करून पक्ष संघटनेला बळ द्यावे, असेही ते म्हणाले.
युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, विराज निकम, युवासेना कोअर कमिटी सदस्य स्वप्निल लांडगे, सिद्धार्थ पांडे, सिद्धेश अभंगे, युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, ओवळा माजीवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी, कोपरी पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, युवतीसेना कोअरकमिटी सदस्य पुजा लोंढे, क्षितिजा कांबळे, श्वेता सुयोग व श्वेता म्हात्रे त्याचसोबत युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.