अधिकाऱ्याची मालमत्ता विभागात बदली
नवी मुंबई : अतिक्रमण विभागाचा पदभार सांभाळताच कारवाईचा धडाका लावणाऱ्या डॉ.राहुल गेठे यांच्याकडून अतिक्रमण विभागाचा पदभार काढून त्यांची मालमत्ता विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर अतिक्रमण विभागाचा पदभार पुन्हा एकदा सोमनाथ पोटरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत शासनामार्फत डॉ.राहुल गेठे कायम स्वरुपी नियुक्ती करण्यात आली होती.
आणि पालिकेत त्यांच्याकडे अतिक्रण विभाग देण्यात आला होता. अतिक्रमण विभागाची सूत्रे हाती घेताच उपायुक्त गेठे यांनी आठवडाभरातच सामाईक जागेतील शेकडो अतिक्रमणांवर कारवाया केल्या असून अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. यात शहरातील व्यवसायिकांनी विशेषतः हॉटेल आणि बार व्यवसायिकांना लक्ष करत कारवाईचा बुलडोझर फिरवला होता. यातील बहुतांश कारवाया विना नोटीस केल्या होत्या. त्यामुळे या व्यवसायिकांनी अर्ध्या रात्री तडक ठाणे गाठत डॉ राहुल गेठे यांच्या दादागिरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे
मांडले. त्यानंतर सारी सूत्रे हलली आणि आयुक्त राजेश नार्वेकर यांनी गेठे यांची तडकाफडकी बदली केली अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
अवघ्या दोन आठवड्यातच गेठे यांच्या बुलडोझरला ब्रेक लावला असून त्यांची आता मालमत्ता विभागात बदली करण्यात आली आहे.