भाईंदर: विरारच्या पापडखिंड धरणात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बुडणाऱ्या अन्य दोघांना स्थानिकांनी वाचविले.
या धरणातून विरार शहराला दररोज शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असूनही वसई-विरार शहर महापालिकेकडून सुरक्षिततेचा अभाव असल्याने कोणतीही व्यक्ती सहजपणे धरणाच्या पाण्यात प्रवेश करीत असल्याने अशी दुर्घटना होत असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विरार शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या विरार फुलपाडा येथील पापडखिंड धरणाच्या पाण्यात रविवारी संध्याकाळी सुट्टी असल्याने पापडखिंड धरणावर व वसंत बोराडे आपली पत्नी मुलगा ओम व शेजारचे अन्य दोघे जण फिरायला गेले होते. यापैकी तिघेजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. स्थानिकांनी हर्ष (१२) व त्याच्या सोबतच्या वंशला वाचविले. मात्र ११ वर्षीय ओमला वाचविता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. पापडखिंड धरणात पोहण्यासाठी बंदी असतानाही अतिउत्साही व्यक्ती बंदी धुडकावून पाण्यात उतरत असल्याने अशा दुर्घटना होत आहेत.